थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Tuesday, 8 May 2012

कैरीचे लोणचे (खान्देशी पद्धतीचे)

मंडळी, लोणच्याचा सिझन सुरु झाला आहे. खान्देशी पद्धतीच्या लोणच्याची चव चाखायचीय?
चला तर मग...
परवाच आईला सोबत घेउन लोणचे केले. आईच्या हातचे लोणचे आमच्या आख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे. इथे पुण्यातही कॉलनीत, ओळखीच्यांकडे असे कुठुन कुठुन तिला बोलावणे असते लोणचं टाकण्यासाठी. एकदा तर बहिणीने नाशिकहुन फोन करुन ऑनलाईन लोणचे घातले होते. त्याची चवही अप्रतिम आली होती. स्मित
सगळी कृती आईचीच...मी फक्त हेल्पर.
एकाच गोष्टीबद्दल माफ करा लोक्स. लोणचं (ऑफीसातुन संध्याकाळी घरी गेल्यावर) रात्री टाकल्याने फोटो म्हणावे तितके चांगले आलेले नाहीत.

साहित्यः
कैर्‍या: १० किलो
मीठः दीड किलो
गोडेतेलः २किलो
ब्याडगी मिरची तिखटः अर्धा किलो
ब्याडगी मिरची आख्खी: पाव किलो किंवा अंदाजे
मोहरी दाळः ३ पाव
बडीशेपः अदपाव ( एक मध्यम वाटी भरुन)
मेथी: १५० ग्रॅ.
धणे: १५० ग्रॅ.
लोणच्याचा मसाला:
मीरे, लवंगा, दालचिनी, सूंठ पावडर - सर्व एक एक चमचा(पोह्यांचा)
हिंगः २ चमचे
वेलदोडे: १ चमचा
जायफळ (किसुन) : १ चमचा
क्रमवार पाककृती:
सर्वप्रथम कैर्‍या दोन दिवस पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर व्यवस्थित कोरड्या पुसुन सुड्याने(कैरी फोडण्याची विळी) फोडी करुन घ्याव्यात. आतला गर इ. काढुन टाकुन कैरीच्या फोडीसुद्धा पुसुन घ्याव्यात.


नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे आणि प्रमाण दिल्याप्रमाणे लोणच्याच्या मसाल्याचे सगळे जिन्नस कढईत टाकावे.गोडेतेल गरम करुन (कडकडीत पण उकळते नको) ते यात हळुहळु टाकावे...म्हणजे लाल तिखट खरपुस भाजले जाते आणी छान लाल रंग येतो शिवाय चवीतही फरक पडतो. ब्याडगी आख्खी मिरची तव्यावर थोड्या तेलावर भाजुन घ्यावी आणि यात कालवावी.
सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.

एका बाजुला लोणच्याची बरणी (चिनीमातीचीच घेणे सोयिस्कर), व्यवस्थित पुसुन घ्यावी आणि मगच त्यात लोणचे भरावे.
फोडींच्या वर तेल येइल इतके तेल असावे.
लागणारा वेळ: 
२ तास

टिप: लोणचं टिकण्यासाठी मीठ आणि बुडतं तेल आवश्यक आहे.

माहितीचा स्त्रोतः मातोश्री
 
 
 
 
 
 
आणि आता २ महिन्यांनी संपुर्णपणे मुरल्यावर हे लोणचं असं दिसतय. :)
 

 
 

Thursday, 3 May 2012

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.

आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.


टीपः डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे