थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Saturday 10 October 2015



जन्म: 1880
विवाह: 13 व्या वर्षी
मृत्यु: 1951
अवघ्या तिसाव्या वर्षी वैधव्य आलेली ही महाजनांच्या घरची निरक्षर लेक...
"जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांचा अभिप्राय.
तत्वज्ञानाचे विद्यापीठ असच जिला संबोधता येईल अशी खानदेशातील 'आसोदे' गावाची कवयित्री बहिणाबाई चौधरी!
"ज्याच्यातुन येतं पीठ त्याले जातं म्हणू नहीं", " लेकीच्या माहेरा साठी माय सासरी नांदते"," माय ले माय म्हणता ओठ ओठालागी भिड़े, सासुले सासु म्हणता तोंडातुनी गेला वारा" अस किमान शब्दात अर्थाची परिसीमा गाठणारं ... जीवघेणंही हसत हसत शिकायला सोशिक जीवनाची बंदिस्त घुसमटलेली 'शाळा'च हवी हो! 


"वसांडली मोट
करे धो धो थायन्यात
हुंदडतं पानी
जसं तान्हं पायन्यात" 


मोटेतुन थाळन्यात पडणारे धो धो खळाळत वाहणार्या पाण्याला पाळण्यात थयथय पाय वाजवणार्या तान्हुल्याची उपमा ही खान्देश कन्या च देऊ जाणे!
'काव्यदिंडी' च्या समारोपाच्या दिवशी बहिणाई ची मुद्दामच ज़रा अनवट कविता निवडलिये. फारशी कुणाला माहीत नसावी. साधीशीच् कविता आहे. मला भावला त्यातला निर्व्याजपणा! ग्रामीण स्त्रीची व्यथाच निराळी! खटल्याच् घर. खाणारी तोंडे 15-16. पायलीच्या भाकरी थापाव्या लागत आणि त्यात आख्ख्या घरादाराची पोटाची सोय करणारा चूल्हा रुसला तर घरधनीण चे हाल बघायला नकोत!
आज आम्हाला हातासरशी हवं असतं. एका क्लिकवर आज घरपोच जेवण मिळतं. पण 'ती' च्याजागी स्वत:ला कल्पुन बघितल तर जाणवते ते चुल्ह्यासारखेच निखाऱ्यावरचे आयुष्य!
आणि अश्या स्थितीत रोजच्या कामात, सहजधर्मात काव्य स्फूरणे म्हणजे ही निसर्गदत्त काव्यप्रतिभाच म्हणावे लागेल. 


"चूल्हा पेटता पेटना!"
*
घरी दाटला धुक्कय
कसा हाटता हाटेना
माझे डोये झाले लाल
चूल्हा पेटता पेटना !
*
कसा पेटता पेटना
चूल्हा किती फुका फुका
लागल्या रे घरामंधी
अवघ्याले भुका भुका!
*
आता सापड़ेना हाती
कुठे फुकनी बी मेली
कुठे पट्टवकरीन-
' नूरी, पयीसन गेली!
*
आता गेल्या सरीसनी
पेटीमधल्याआक्काडया
सर्व्या गेल्या बयीसनी
घरामधल्या संकाडया!
*
पेट पेट धुक्कयेला,
किती घेसी माझा जीव
आरे इस्तवाच्या धन्या
कसं आलं तुले हींव !
*
तशी खांबाशी फ़ूकनी
सापडली सापडली
फूंकी- फूंकीसनी आग
पाखडली पाखडली!
*
आरे फुकनी फूंकता
इस्तो वाजे तड़तड़
तव्हा धगला धगला
चूल्हा कसा धड़धड़!
*
मंग टाकला उसासा
थोड़ा घेतला इसावा
एकदाचा आदयला
झट चुल्ह्यावर तावा!
*
आता रांधते भाकर
चुल्ह्यावर ताजी ताजी
मांघ शिजे वजेवजे
भांगचुल्हीवर भाजी!
*
खुप रांधल्या भाकरी
दुल्ळी गेली भरीसनी
मंग हात धोईसनी
इस्त्यावर पड़े पानी!
*
इस्त्यावर पड़े पानीं
आली वाफ हात लासे
तव्हा उचलता तावा
कसा खदाखदा हांसे!
****************