थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Friday 28 February 2014

अहिराणी कविता



मंडळी,

काल मायबोली.कॉम या वेबसाईटवर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. त्यात एक 'बोलीभाषेतील काव्यधारा' असा उपक्रम होता.
त्यानिमित्त लिहिलेलं हे काही.

थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली. झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता.बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं, आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं. मग त्याच अवस्थेत, तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या. गोड मानुन घ्याव्या.

(घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची. तिला जाऊन आता २०वर्ष झाली. आई-बाबांची भाषा मराठीच. अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं, हा पहिलाच प्रयत्न. म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय.)

आजली बोले अहिराणी
माय मन्ही मराठी
अहिराणीमां लिखाले
बुद्धी दे वं बहिणाबाई

मतलबी रे मानसा
कसा व्हयना निर्दयी
कुर्‍हाड चाले झाडावर
घाव लेकीच्या हृदयी

(सोनचाफा)
तुन्हं फुल पहिलं वहिलं
बाबांच्या अस्थिवर वाहिलं
आज तुले छाटतांना
मन का रे नाही द्रवलं?

('केशर' आंबा)
हतबल मन्हा बाबा
बठे तुन्ह्या सावलीमां
होता वैभव निरखीत
मरणाच्या दारात उभा

(पेरु)
हाई आम्हना 'सरदार' पेरु
लोका सांगे कवतिके
त्यान्हाच खाले 'शेवटनं'
बाबाले न्हाऊ घाले लोके

असा कसा रे देवा
न्याव(न्याय) तुन्ह्या घरचा
लेकरान्या घरट्याकरता
बळी 'जुन्या खोडाचा'


आते कसानी सावली?
कोठेना 'खंड्या' नि 'कोकिळा'?
मन्या आंगणमां उना
बठ्ठा रखरखीत उन्हाळा

1 comment:

  1. फारच छान ब्लॉग अन लिखाण आहे.

    ReplyDelete