थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Thursday 1 March 2012

अहिराणीतील खमंग संवाद!

अहिराणीतील खमंग संवादः
नुकतेच 'मराठी दिनानिमित्त' मायबोली या वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.

 प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे.

त्यातली ही माझी एन्ट्री:

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
दुसरी करवली: बैगं! तुन्ह्या लुगड्यामां तं नै अडकनि? कालदिन तु ते जरीनं लुगडं घालेल व्हतं ना! त्यामां धुंडी ले तं पह्यले.नवरीनी मावशी: आह्या माय वं! तुन्हा नाकमां तं दखी व्हती मी, तु बेळमाथनी पुजी राह्यन्थी तव्हय. कोन मरी जाय जो ना हात मां पडी व्हई ना तं कल्याण शे!

पहिली करवली: हाव ना व माय ! आते दिप्वॉळीले लिन्थी! यास्ले कळनं तं मन्ही काई खैर नई.


नवरीनी मायः हा वं बहीन्! जवाईले कळनं तं मग बसं व्हई गयं! आसा दांगडो घाली तो लगिनमां. आन दख तु...आथाईनच वापस जाई इले लिसन! आखो तिले आयुसभर डोस दीथीन तिन्हा सासरकडना लोके ... "भाउना लगिनमां गयी आन नथना आहेर करी उनी चोरास्ले.!!! " तुले सांगस.. हाई शुभीना नवरा भलता आग्यायेताळ शे! एक येळ इस्तव हातमां धरी जाई पन ह्यास्ना सोभाव ना ... बाप रे बाप! शुभे, तु आतेपुरती मन्ही नथ घाली ले बईन! पन त्यास्ले आतेच नको सांगु!


इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.

"माय वं, अण्णाले पह्यलेच सांगं व्हतं मी की मन्ह्या नंदासकडं (नणंदा) बी निवतं धाडनं पडी, पन त्यास्ले पत्रिका नै मियनी आतेपावत. तं मन्ही सासु कितली बोलनी माले, म्हाईत शे का? की इन्हा मायबापले काही वळनच नै शे तं पोरले कसं व्हई?, आनि इन्हा बाप तर नाक वर करीसन बोलस.. आसं आनि तसं...!" तु आते ना आते शरदले (चुलतभावाला) गाडी लीसन धाड आणि मन्ही नणंदले ली ये म्हना! माले काई म्हाईत नै...
नवरीनी मायः का वं कस्तुरा? माले एक सांग, तुन्ही नणंदना देरना (दिराच्या) लगनमां आम्हले निवतं धाडं व्हतं का?आन मंग आते कसा बोलतस तुन्हा सासरकडना? हाई दख! आते तुले खमकी व्हयनं पडी. ४ साल व्हई ग्यात लगनले...

नवरीना बापः आटपा आटपा... तठे नवरदेव ई लागना पारवर आनि तुम्ही काय चावळी राह्यनात आठे? हाऊ बबन्या कोठे शिलगना? वर्हाडना स्वागत कराले फुलमाळा सांगन्या व्हत्या मी कोपर्यावरन्या फुलवालाले! लेवाले ग्यात का कोन? तो सत्या, आज्या तर काई कामनाच नै शे!

त्या वाजावाला, पोटझोड्या उनात का? त्याले म्हना नेमबंद वाजवा, नवरदेवकडना वर्‍हाड पोची राह्यनं ! कव्हय जाई हाई 'सुख्या' आते पारवर? त्यान्हाबरोबर कोन जाई राह्यनं? शेवंता, धुरपदा,कली तुम्हन्या पोरेस्ले धाडा बरं सुख्याना बरोबर!

बबन्या: हाई काय ई राह्यनु हार लीसन! घ्या वं बहिनीओन... गजरा बांधा!

नवरीना काका(नवरीना बापले): दादा, मानकर्‍यास्नी लिश्ट व्हई ना? हाई नारय आनेल शेतस..,. नेमबंद मोजी ल्या बरं! पंगतीमां त्यास्ना ताटेसले लावाना शेतस!

नवरीनी आजली (आज्जी) : तेलनपापड्या लिध्यात का? आन सांजोर्‍या? त्या परमिलाले इचार बरं! गिरजे... नवरदेवले पारवर देवाले दुधशेवाया ली ले तं ताटमां!
नवरीची आई: हाओ आत्याबाई( सासुबाईला आत्या म्हणतात)! लिधं बरं मी बठ्ठं सामान!
नवरीना काका: चला चला..गाडीमां बठी ल्या!