थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Monday 18 January 2016

गेल्या वर्षीच्या युनिक फीचर्स 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली माझी अहिराणी भाषेतली कथा आज वाचकांसाठी देत आहे, अर्थात पुर्वपरवानगीने !


चव नै न ढंव नै सोंगाडी

शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.
पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड. सत्तरीले टेकनी तरी बाईना आवाज खणखणीत, बुद्धी तल्लख व्हती.तशी चार बुक शिकेल व्हती. थोडबहुत ए बी सी डी पन ये वाचता. आजकाल गावना पोरेटोरेस्ना तोंडमां डाटा कनेक्शन, रिचार्ज, इन्टरनेट,सिमकार्ड असे शबुद येत… त्या म्हतारीना कानवर पडे. धल्लीनं घर मोठ खटल्यानं. तिले ३ आंडोर आन १ आंडेर! १० साल व्हई ग्यात आंडेर ना लगन ले. ४ साल पह्यले जवाई फारेन ले गयथा तं तठेच घर लिधं आन मंग अस्तुरी(बायको) ले बी लइ ग्या. घरमा धल्लीनीच काठी फिरे. बठ्ठा कारभार तिन्हाच हातमां. बैठं ६ खोल्यास्न घर. तरीबी घरमाना बठ्ठा लोके आंगणमाच झोपेत. पुरुषेसले लोखंडी पलंग, धल्लीमाय बाजल्यावर आणि खाली झोऱ्या टाकीसन 'व्हवा'(सूना),नातु झोपेत.
धल्लीना सकाय सकायले आंगणमाच बठीसन तोंडना पट्टा सुरु व्हये. म्हतारीले गाया शिव्या त एकदम तोंडपाठ. (कोनी छाती नै व्हती म्हतारीले उलट उत्तर देवानी. हा धाकली 'व्हवु' थोडी शिकेल व्हती. ती थोडे उत्तर दे पण ते काय फुसका फटाकाना गत.)
“अय भुरी पाल! काब्रं त्या गाद्यास्वर कुदी राह्यनी वं!खुंदाली खुंदाली चिपट्या व्हई जायेल शेतस त्या तुन्ह्या नाक ना गत!
त्या झिपाट्या आवर आन तुन्ह मुसडं पाह्यनं का? जसा उंदरे मांजरे मुतेल शेतस! शिलग तठे! चव नै न ढव नै सोंगाडी!
"हाउ सत्त्या कथा तरफ़डना?बठेल व्हई त्या मोबाईल लिसन! उठरे तीन डाव, तोच धंदा! आंगले पानी नै न गांxxxxले पानी नै! सकाये सकाये मरी जाय जो ते डबडं लीसन बठतंस! आह्य्याह्या काय या आतेना पोरे! बाल काय वाढवतस, छातडं काय उघडं टाकतस, ती इजार कथी जास कुल्लाना खाले!”
आसा म्हतारीना वटका सुरु व्हयना का व्हवा खाली मुंड्या घालीसन काम करेत.गरीबना घरन्या पोरी करेल व्हत्या. मोठान हसाले बंदी व्हती.त्या बिचार्या तोंडमा पदर कोंबीसन हासेत. चौधरीनना सकायना चहा, नाश्टा तठे खाटलावरच व्हये . ११ वाजनात का धाकटी व्हवु इचाराले ये '" आत्याबाई, जेवाले काय करान?" मग धल्ली म्हणे," काही नाही व्हयी ते डुबुकवडासनी मसालानी भाजी करी टाक, उकाव!"!
व्हवा सैपाक ले लागी ग्यात का, मंग म्हतारी बागेच वावर मा चक्कर टाके. साल्दारास्ना पगारपाणी तिन्हाच हाथामा व्हतं.
४वाजनात का म्हतारी आंगन मा यी बठे. वाटवरन्या आयाबायास्ले बलाये इकडनं तिकडनं चावळाले.
"व धोंडी! तुले समजनं का?”
"हा बोल वं माडी! काय व्हयनं ! आज काय खबरबात? " अशी सुरुवात व्हयनी का समजी लेवान आते दिवेलागणी व्हयीस्तोवर म्हतारी काय उठाउ नई!
परोनदीन नी गोट शे! धल्लीनी चाभर चाभर सुरु व्हयनी.
“वं बहिन तुले काय सांगु! भलता उप्पात मांडेल शे या मोबाईलनी! मांगल्या महिन्यामा लगिनले गयथु. तथानी गंमत सांगस तुले. नवरदेव पारवरथुन ऊना,लगिन लागं, हार टाकायी ग्यात ! नवरदेव नवरीले होमना जोडे बठाडेल व्हतं. तर ती नवरी खाली मुंडी घाले आन हासे. मी म्हंत,काय चांगलं वळण लावेल शे पोरले मायबापनी! वर मान करीसन बघत बी नाई हाई पोर! नैत तिना जोडे बठेल ती सांडोरी! त्या झिपाट्या, त्या बाल बठ्ठा उंद्री लागेल आन त्या कपडा!नुसता नखराच देखी ल्या! चवनीन ढवनी सोंगाडी! मी धीरेच मना व्हवुना कान मा बोलनु. दख व इजु, आसं वळण जोयजे पोरीस्ले. मन्हा आबाना करता अशी पोरगी जोयजे, नै का? व्हवु तोंडले पदर लावीसन धीरेच माले बोलनी. म्हने "नई व आत्याबाई, ती त्या मोबाईल मा दखी राह्यनी,त्या व्हॉटस अप का काय म्हंतस ना त्यामां.
हात्तं मरो, काय जमाना येयेल शे! आसा बठ्ठा लोके चगी जायेल शेतस त्या डबडाना पायरे! इतला इतला पोरे आखो गांxxxx धुवानी अक्कल नै न त्या बी मोबाईल मां बोटे घाल्तस! त्या मन्हा नात नातु बी दिनभर आथा तथा कुत्र्यानं गत पयतस आन संध्याकायले घर येताबरोबर ते डबडं हातमां! एकनं तोंड इबाक, एकनं तिबाक.ना घरमां काई काम, ना अभ्यास, ना येरोनेर संगे काही बोलनं ! बस्स आख्खी रातभर त्या मोबाईल टिभलतस! त्या पोराटोरास्लेच काय म्हनावं! त्या आम्हन्या नटमोगऱ्या शिकी जायेल शेतस आते! काम मा ध्यान नई शे.मोबाईलमा टुकटुक व्हयनं का लगेच घेवाले पयतस! कालदीन तं आख्खा कुकर शिट्ट्या फुकी फुकीसन काया पडी ग्या.पण एकन बी ध्यान नई व्हतं. मंग वरजनु,"कथा शिलगन्यात ठिगळ गोमाश्या?ग्यास इझाडी द्या ना! कान शेतस का सुपडां?चवन्यान ढवन्या…!” मंग दखं त धाकली कानमा त्या मोबाईलन्या काड्या घालीसन आरामशीर बठेल शे. घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा!
इबाक धल्लीनं चावयनं व्हयनं. अन तिबाक धाकली व्हवु ने आंडेर ले बलाई लिधं. खुसफुस व्हयनं .येरोनेर नी डोयाना इशारा किधा आणि आंडेर म्हतारीना जोडे जाई बठनी!
“आज्जी, वं आज्जी!”
“काय शे वं? “
“हाई दख ना! मी तुले एक मजा दाखाडस! “
“काय दाखाडी राह्यनी?”
“हाई दख! आते मी तुले हाई मोबाईल कसा वापराना ते शिकाडी देस!”
हावो! आते माले काय करनं शे शिकीसन? आरध्या गवर्या ग्या मन्ह्या मसनवटीमां!
आज्जी! आवं तुले हाई उनं ना तं तुले आत्या बी दिखी यामा. परोंदिनच मी हाई व्हाटस अप टाकेल शे. आते तु तिन्हा संग बात बी करु शकशी.
आंडेरनं नाव काढता बरोबर म्हतारी ना चेहरा खुलना.
"काय सांगी राह्यनी? माले तर काही समजी नही राह्यनं! मरो काय काय नविन टेकनिक यी काय सान्गता येत नै!"
“दम धर,मी शिकाडस तुले! आते दख हाई आठे आस सापना गत बोटे फिरावा ना कि तो मोबाईल उघडी जास.“
धल्ली: आह्या माय वं! खोलनं पडस का हाई डबडाले बी?
नातः हावो मंग त्याले बी कुलुप ऱ्हास!
धल्ली: आस बी ऱ्हास का? तुन्हा मायना तोंडले नै का व काई आस काही कुलुप लावता यी?
नातः आज्जी तु आथा द्ख ना! हाई द्ख आते असा बोट फिरावना का हाई पडदा पडस. मग हाई कोपराले चौकोन दिखी राह्यनात का तुले?
धल्ली: हा वं माय, दिखी राह्यनात ना!
नातः त्याले बोट लाव बरं!
धल्ली: हाव ह्ये लावनं बोट. हाई काय उनं आते?
नातः आज्जी तुले ए बी सी डी येस ना?मंग आठे काय शे? D ते डाटा कनेक्शन र्हास. त्याले बोट लाव.आते हाई खुली गय विंटरनेट!
धल्ली; वं मन्ही माय वं! याले म्हंतस का ते विंटरनेट,फिंटर्नेट ...!
नातः नई ना वं आज्जी! आखो शे...
धल्ली: हा वं माय.तुच राह्येल व्हती माले शिकाडानी आते.खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी!
नातः तु दख त खर गंमत. मंग जे काय यी ना त्याले ok म्हनानं म्हन्जे हाई ok लिखेल शे ना त्याले बोट लावानं .व्हयनं? आते हाई हिरवा फोन दिखी राह्यना का तुले? हाई व्हाटसआप र्हास....
धल्ली: हा वं माय!
नातः त्याले बोट लाव. बस्स व्हई गय सुरु.
धल्ली: हा लावना बोट, आखो?
नातःमंग आते तुले आत्याना फ़ोटो दिखस का?
धल्ली: वं माय वं! काय लक्ष्मी ना गत दिखी राह्यनी मन्ही पोर!
नातः आते हाई दखस का मराठी "अ आ ई.तठे त्या अक्षर टाईप कराना. तुले थोडी प्रेकटीस करनी पडी. पण यी जाई! टाईप कर बर आठे!
धल्ली: काय टाईप करानं? आवाज बी यी का तिन्हा याम्हां?
नातः हा आवाज बी येस ना! काय बी टाईप कर! पह्यले तिले सांगजो बरं तु कोन बोली राह्यनी ते.
धल्ली: बर्र." को न? अ ल की शे का. मी तु न ही मा य बो ली रा ह नु आ था ई न!
नातः व्वा व्वा आज्जी! तुले त एका झटका मा यी गय!
धल्ली: पन मंग माले कसं समजी की ती बी तिकडुन बठेल शे हाटस अप वर!
नातः आव आज्जी,आत्या जव्हय यी तव्हय ती तथाईन मेसेज टाकी दी ना! ती बग उनी आनलाईन! हाई तिन्ह नाव ना खाले लिखेल शे ना ते वाची ले विन्ग्लीश मा!
बास्स, त्या दिनथीन धल्लीनी शिकवनी सुरु व्हयनी.
धल्ली: काय मस्त शे व हाई डबडं! मी उगाच त्याले गाया देउ पह्यले. आते तं मी रोज आंडेर ना संगे गप्पा मारु!
नातः आज्जी,इतलच नै शे. मी तुले गेम बी शिकाडस दख! हाई शे 'सबवे सर्फ' गेम!
धल्ली: माले फक्त सर्फ नी पावडर म्हाईत शे वं बहिन!
नातः आवं आज्जी हाई रेस ना गेम र्हास! हाई दख.हाई आगगाडीना रुय शेतस ना, हाई पोरगा शे ना तो दख आगगाडीनावर काहीतरी चिंखडी राह्यना ब्रश लिसन. म्हणुन त्याना मांगे हाऊ पोलीस शिपाई लागस. आते त्या पोर्याना वर तु बोट लावं का तो जीव खायीसन पयस. मधे मधे सोनान्या नाणां पडेल शेतस त्या बी गोया करस. हा फक्त एक ध्यानमां रखजो का त्या पोर्यानी टक्कर नई व्हयनी पायजे आगगाडीना डबाले. हाई आसा मोबाईलना वर बोटे फिरावा का तो आगगाडीना वर चढीसन पयस. तठे बी सोनाना नाणां रखेल शेतस दख! बस आपनले जादा से जादा हाई सोनाना नाणा गोया करना शेत.
हाई आठे नात धल्लीले शिकाडी राह्यंथी आन तठे सैपाकघरमां येरोनेरना हातवर टाया पडी राह्यंथा. ह्ये आस व्हयन नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये”
आते धल्ली रोज सकाय सकाय उठनी का खाटवर बठस. उसशीना खाले रखेल मोबाईल काढस. रोज आंडेर ना संगे बात करस. नेट पॅक संपना का एक शंभर नि नोट आणि एक पन्नासनी नोट देस नातुले. मंग नातु १४० ना नेट पैक रिचार्ज मारी येस आणि १० नी नोट नातु ना खिसामा जास. एकच व्हयनं धाकली व्हवुले तिन्हा मोबाईल कुर्बान करना पडी ग्या थोडा दिन. पन त्यान्हा काय फरक नै पडाउ.ती गंज लाडका दिव्वा शे तिन्ह नवर्याना. भेटी जाई तिले बी नवा मोबाईल.
आते रोज सकाये सकाये चौधरीनना आंगणमां शांती र्हास आन बठ्ठ्या "चव नै न ढव नैन सोंगाड्या" बी निवांत र्हातस.
                                                                 __xxx_

Saturday 10 October 2015



जन्म: 1880
विवाह: 13 व्या वर्षी
मृत्यु: 1951
अवघ्या तिसाव्या वर्षी वैधव्य आलेली ही महाजनांच्या घरची निरक्षर लेक...
"जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांचा अभिप्राय.
तत्वज्ञानाचे विद्यापीठ असच जिला संबोधता येईल अशी खानदेशातील 'आसोदे' गावाची कवयित्री बहिणाबाई चौधरी!
"ज्याच्यातुन येतं पीठ त्याले जातं म्हणू नहीं", " लेकीच्या माहेरा साठी माय सासरी नांदते"," माय ले माय म्हणता ओठ ओठालागी भिड़े, सासुले सासु म्हणता तोंडातुनी गेला वारा" अस किमान शब्दात अर्थाची परिसीमा गाठणारं ... जीवघेणंही हसत हसत शिकायला सोशिक जीवनाची बंदिस्त घुसमटलेली 'शाळा'च हवी हो! 


"वसांडली मोट
करे धो धो थायन्यात
हुंदडतं पानी
जसं तान्हं पायन्यात" 


मोटेतुन थाळन्यात पडणारे धो धो खळाळत वाहणार्या पाण्याला पाळण्यात थयथय पाय वाजवणार्या तान्हुल्याची उपमा ही खान्देश कन्या च देऊ जाणे!
'काव्यदिंडी' च्या समारोपाच्या दिवशी बहिणाई ची मुद्दामच ज़रा अनवट कविता निवडलिये. फारशी कुणाला माहीत नसावी. साधीशीच् कविता आहे. मला भावला त्यातला निर्व्याजपणा! ग्रामीण स्त्रीची व्यथाच निराळी! खटल्याच् घर. खाणारी तोंडे 15-16. पायलीच्या भाकरी थापाव्या लागत आणि त्यात आख्ख्या घरादाराची पोटाची सोय करणारा चूल्हा रुसला तर घरधनीण चे हाल बघायला नकोत!
आज आम्हाला हातासरशी हवं असतं. एका क्लिकवर आज घरपोच जेवण मिळतं. पण 'ती' च्याजागी स्वत:ला कल्पुन बघितल तर जाणवते ते चुल्ह्यासारखेच निखाऱ्यावरचे आयुष्य!
आणि अश्या स्थितीत रोजच्या कामात, सहजधर्मात काव्य स्फूरणे म्हणजे ही निसर्गदत्त काव्यप्रतिभाच म्हणावे लागेल. 


"चूल्हा पेटता पेटना!"
*
घरी दाटला धुक्कय
कसा हाटता हाटेना
माझे डोये झाले लाल
चूल्हा पेटता पेटना !
*
कसा पेटता पेटना
चूल्हा किती फुका फुका
लागल्या रे घरामंधी
अवघ्याले भुका भुका!
*
आता सापड़ेना हाती
कुठे फुकनी बी मेली
कुठे पट्टवकरीन-
' नूरी, पयीसन गेली!
*
आता गेल्या सरीसनी
पेटीमधल्याआक्काडया
सर्व्या गेल्या बयीसनी
घरामधल्या संकाडया!
*
पेट पेट धुक्कयेला,
किती घेसी माझा जीव
आरे इस्तवाच्या धन्या
कसं आलं तुले हींव !
*
तशी खांबाशी फ़ूकनी
सापडली सापडली
फूंकी- फूंकीसनी आग
पाखडली पाखडली!
*
आरे फुकनी फूंकता
इस्तो वाजे तड़तड़
तव्हा धगला धगला
चूल्हा कसा धड़धड़!
*
मंग टाकला उसासा
थोड़ा घेतला इसावा
एकदाचा आदयला
झट चुल्ह्यावर तावा!
*
आता रांधते भाकर
चुल्ह्यावर ताजी ताजी
मांघ शिजे वजेवजे
भांगचुल्हीवर भाजी!
*
खुप रांधल्या भाकरी
दुल्ळी गेली भरीसनी
मंग हात धोईसनी
इस्त्यावर पड़े पानी!
*
इस्त्यावर पड़े पानीं
आली वाफ हात लासे
तव्हा उचलता तावा
कसा खदाखदा हांसे!
****************

Friday 28 February 2014

अहिराणी कविता



मंडळी,

काल मायबोली.कॉम या वेबसाईटवर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. त्यात एक 'बोलीभाषेतील काव्यधारा' असा उपक्रम होता.
त्यानिमित्त लिहिलेलं हे काही.

थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली. झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता.बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं, आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं. मग त्याच अवस्थेत, तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या. गोड मानुन घ्याव्या.

(घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची. तिला जाऊन आता २०वर्ष झाली. आई-बाबांची भाषा मराठीच. अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं, हा पहिलाच प्रयत्न. म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय.)

आजली बोले अहिराणी
माय मन्ही मराठी
अहिराणीमां लिखाले
बुद्धी दे वं बहिणाबाई

मतलबी रे मानसा
कसा व्हयना निर्दयी
कुर्‍हाड चाले झाडावर
घाव लेकीच्या हृदयी

(सोनचाफा)
तुन्हं फुल पहिलं वहिलं
बाबांच्या अस्थिवर वाहिलं
आज तुले छाटतांना
मन का रे नाही द्रवलं?

('केशर' आंबा)
हतबल मन्हा बाबा
बठे तुन्ह्या सावलीमां
होता वैभव निरखीत
मरणाच्या दारात उभा

(पेरु)
हाई आम्हना 'सरदार' पेरु
लोका सांगे कवतिके
त्यान्हाच खाले 'शेवटनं'
बाबाले न्हाऊ घाले लोके

असा कसा रे देवा
न्याव(न्याय) तुन्ह्या घरचा
लेकरान्या घरट्याकरता
बळी 'जुन्या खोडाचा'


आते कसानी सावली?
कोठेना 'खंड्या' नि 'कोकिळा'?
मन्या आंगणमां उना
बठ्ठा रखरखीत उन्हाळा

Thursday 22 August 2013

हाई ल्या आखो कानबाईनी गानी!


हाई ल्या आखो कानबाईनी गानी!
१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. :)

१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्‍यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार


३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं



Wednesday 24 April 2013

आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

पुढच्या महिन्यात आखाजी आहे मंडळी!भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात तो सासुरवाशिणींचा सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.  सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!

काल इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.

माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती'. उन्हाने खडक तापुन लाल झालेत. त्यावरुन पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.

चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड


माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...!  दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.  झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.

वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय


इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.

गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा


आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला  येतो. आता त्याला इथे 'राम' संबोधतात. सासुरवाडीचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते.  नवर्‍याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.

गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी


गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. पण आपली गौराई कसली शुर! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.

काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी


सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई


इंटरनेटवरुन साभार!!


Saturday 30 March 2013

धुळानी धुळवड


लोकेसहो!
आतेच धुळवड खेळी ना! आम्हन्या धुयामां बी होळी ना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यान्हा टाईमले धुळवडना मोठा दांगडो व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे विशेष शे. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजतस. ५वी गल्ली बाम्हन लोकेस्नी. तीन्हा बाजुले खोलगल्ली- गल्ली नंबर ४. बारीशमां आख्खा गावनं पाणी खोलगल्ली मां भरे. खोलगल्लीना जोडे आग्रा रोड... कपडास्ना आणि सराफ बाजार. आग्रा रोडना एक साईडले पाच कंदील.
पुर्वी माघ पौर्णिमा ले म्हन्जे होळीना पह्यले नी पौर्णिमालेच रस्तामां खड्डा खणीसन एरंडनं झाड गाडी देत. मग बठ्ठा लोकेस्नी समझी लेवानं की होळी महिनाभर शे आते. स्मित होळीना पह्यले आठ दिन पोरेसोरेस्नी लगबग सुरु व्हये....वर्गनी आणि लाकडं मांगानं करता. जर गल्लीमां कुणी लाकडं नै दिधी तं बस्स...त्याले असा तर्रास देये पोरे!! एक साल, एक डॉक्टरने वर्गणी मांगाना करता ज्या पोरे जाएल व्हते त्यास्ले हाकलुन दिन्थं. बस्स्...पोरे चिडी ग्यात. रातमां, त्यान्हा डॉक्टरनां बोर्ड काढुन त्या टुकार पोरेस्नी न्हाईना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर. सकायी उठीसन ही बोम्ब व्हयनी व्हती. हाहा
हां तर धुळवडनी बात करी राह्यनु. तव्हय गल्लीना कोपरा कोपरामां मोठा मोठा कलरनं पाणीना ड्रम बैलगाडीमां भरी लईयेत. आणि तठा ठी देत. अन मग रोडवरुन जानारा एक भी माणुस सुटे नै. त्या काय आसं इचकुपिचकु पिचकारी लिसन नै खेयेत. इतली मोठी डोलची मां पाणी लिसन माणसास्ले पाठवर सपका मारे तं तुमन्हा शर्ट काय करतस्...बनियन बी फाटी जाए लोकेस्ना!!! कोनी मजाकना व्हई तं त्याले उचलीसन ड्रममां बुचकाळी देत.

 आते तं काय लोकेस्ले पेवाले पानी नै शे नि काय लोके होळी खेळतीन! तर आशी व्हये आम्हन्या गावनी होळी.
आखो लिखानं शे... येळ मिळी तसं लिखसु. :)

Monday 15 October 2012

    धुळ्याचे आग्रारोडवरील राममंदीरः
 धुळ्यातील हे अतिशय जुने मंदीर. याची उभारणी १९०८ मधे झाली असे तिथले पुजारी सांगतात. गणपतीमधे धुळ्याला गेले तेव्हा आवर्जुन या मंदीराला भेट दिली. अगदी खरं सांगायचं म्हणजे माझ्या बाबांच्या खाणाखुणा जपण्यासाठी भेट दिली मंदीराला. या मंदीराबाबत बाबा आठवण सांगतात ती अशी.
 बाबा बी.ए. फायनल इयरला असावेत तेव्हा. बाबांना कुणीतरी मित्राने असच एक जुनं बुलबुल वाद्य आणुन दिलं. ते घरात आल्यापासुन बाबांचा अभ्यासावरचं लक्ष उडालच. मुळात हुशार असणारे आमचे बाबा, घरच्या परिस्थितीमुळे पिंगळे नावाच्या सद्गृहस्थांकडे पाणी भरायचे. चार मजले असलेल्या इमारतीत सर्वात खालच्या मजल्यावरुन हातात दोन लोखंडी पाण्याच्या बादल्या भरुन चवथ्या मजल्यावर असलेल्या या साहेबांकडे त्यांचा ड्रम  आणि इतर प्यायच्या पाण्याचे हंडे वगैरे भरुन देणं सोप्पं काम नव्हतं. पण पिंगळे साहेबांनी बाबांची शाळेची फी महिना ५ रु. भरायचं कबुल केल्यामुळे ते हे काम करत. तर बुलबुलमुळे अभ्यासावरचं लक्ष उडालं. परिणामी बाबा पहिल्यांदा नापास झाले.
नंतर चुक कळल्यावर बाबांनी झटुन अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी कधी रस्त्यावरच्या दिव्याखाली  तर कधी या मंदीरात असलेल्या दोन वैशिष्ट्यपुर्ण मोठाल्या समयांच्या उजेडात अभ्यास केला. आणि रिजल्ट आला. बाबा, सहा जिल्ह्यांमधे पहिले आले होते. :)
इतकी वर्ष खुद्द धुळ्यात रहात असतांना कधी या मंदीरात जाण्याचा योग आला नाही. पण आता बाबा गेल्यावर हे पाहण्याची इच्छा तीव्र झाली. म्हणुन यावेळेस या मंदीराला अगदी आवर्जुन भेट दिली. आतमधे एक वृद्ध बाबा बसले होते(बहुतेक पुजारी असावेत). त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं 'त्या' समया साखळदंडांनी बांधल्या होत्या. तरी चोरीस गेल्या. मंदीरातील गाभार्याचं काम वैशिष्ट्यपुर्ण आणि अतिशय कलाकुसरीचं आहे. खालील वेबलिंकवर ते दिसेल.
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_2.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_1.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_4.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_5.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_7.JPG