मंडळी,
काल मायबोली.कॉम या वेबसाईटवर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. त्यात एक 'बोलीभाषेतील काव्यधारा' असा उपक्रम होता.
त्यानिमित्त लिहिलेलं हे काही.
थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली. झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता.बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं, आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं. मग त्याच अवस्थेत, तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या. गोड मानुन घ्याव्या.
(घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची. तिला जाऊन आता २०वर्ष झाली. आई-बाबांची भाषा मराठीच. अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं, हा पहिलाच प्रयत्न. म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय.)
आजली बोले अहिराणी
माय मन्ही मराठी
अहिराणीमां लिखाले
बुद्धी दे वं बहिणाबाई
मतलबी रे मानसा
कसा व्हयना निर्दयी
कुर्हाड चाले झाडावर
घाव लेकीच्या हृदयी
(सोनचाफा)
तुन्हं फुल पहिलं वहिलं
बाबांच्या अस्थिवर वाहिलं
आज तुले छाटतांना
मन का रे नाही द्रवलं?
('केशर' आंबा)
हतबल मन्हा बाबा
बठे तुन्ह्या सावलीमां
होता वैभव निरखीत
मरणाच्या दारात उभा
(पेरु)
हाई आम्हना 'सरदार' पेरु
लोका सांगे कवतिके
त्यान्हाच खाले 'शेवटनं'
बाबाले न्हाऊ घाले लोके
असा कसा रे देवा
न्याव(न्याय) तुन्ह्या घरचा
लेकरान्या घरट्याकरता
बळी 'जुन्या खोडाचा'
आते कसानी सावली?
कोठेना 'खंड्या' नि 'कोकिळा'?
मन्या आंगणमां उना
बठ्ठा रखरखीत उन्हाळा