थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Monday, 18 January 2016

गेल्या वर्षीच्या युनिक फीचर्स 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली माझी अहिराणी भाषेतली कथा आज वाचकांसाठी देत आहे, अर्थात पुर्वपरवानगीने !


चव नै न ढंव नै सोंगाडी

शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.
पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड. सत्तरीले टेकनी तरी बाईना आवाज खणखणीत, बुद्धी तल्लख व्हती.तशी चार बुक शिकेल व्हती. थोडबहुत ए बी सी डी पन ये वाचता. आजकाल गावना पोरेटोरेस्ना तोंडमां डाटा कनेक्शन, रिचार्ज, इन्टरनेट,सिमकार्ड असे शबुद येत… त्या म्हतारीना कानवर पडे. धल्लीनं घर मोठ खटल्यानं. तिले ३ आंडोर आन १ आंडेर! १० साल व्हई ग्यात आंडेर ना लगन ले. ४ साल पह्यले जवाई फारेन ले गयथा तं तठेच घर लिधं आन मंग अस्तुरी(बायको) ले बी लइ ग्या. घरमा धल्लीनीच काठी फिरे. बठ्ठा कारभार तिन्हाच हातमां. बैठं ६ खोल्यास्न घर. तरीबी घरमाना बठ्ठा लोके आंगणमाच झोपेत. पुरुषेसले लोखंडी पलंग, धल्लीमाय बाजल्यावर आणि खाली झोऱ्या टाकीसन 'व्हवा'(सूना),नातु झोपेत.
धल्लीना सकाय सकायले आंगणमाच बठीसन तोंडना पट्टा सुरु व्हये. म्हतारीले गाया शिव्या त एकदम तोंडपाठ. (कोनी छाती नै व्हती म्हतारीले उलट उत्तर देवानी. हा धाकली 'व्हवु' थोडी शिकेल व्हती. ती थोडे उत्तर दे पण ते काय फुसका फटाकाना गत.)
“अय भुरी पाल! काब्रं त्या गाद्यास्वर कुदी राह्यनी वं!खुंदाली खुंदाली चिपट्या व्हई जायेल शेतस त्या तुन्ह्या नाक ना गत!
त्या झिपाट्या आवर आन तुन्ह मुसडं पाह्यनं का? जसा उंदरे मांजरे मुतेल शेतस! शिलग तठे! चव नै न ढव नै सोंगाडी!
"हाउ सत्त्या कथा तरफ़डना?बठेल व्हई त्या मोबाईल लिसन! उठरे तीन डाव, तोच धंदा! आंगले पानी नै न गांxxxxले पानी नै! सकाये सकाये मरी जाय जो ते डबडं लीसन बठतंस! आह्य्याह्या काय या आतेना पोरे! बाल काय वाढवतस, छातडं काय उघडं टाकतस, ती इजार कथी जास कुल्लाना खाले!”
आसा म्हतारीना वटका सुरु व्हयना का व्हवा खाली मुंड्या घालीसन काम करेत.गरीबना घरन्या पोरी करेल व्हत्या. मोठान हसाले बंदी व्हती.त्या बिचार्या तोंडमा पदर कोंबीसन हासेत. चौधरीनना सकायना चहा, नाश्टा तठे खाटलावरच व्हये . ११ वाजनात का धाकटी व्हवु इचाराले ये '" आत्याबाई, जेवाले काय करान?" मग धल्ली म्हणे," काही नाही व्हयी ते डुबुकवडासनी मसालानी भाजी करी टाक, उकाव!"!
व्हवा सैपाक ले लागी ग्यात का, मंग म्हतारी बागेच वावर मा चक्कर टाके. साल्दारास्ना पगारपाणी तिन्हाच हाथामा व्हतं.
४वाजनात का म्हतारी आंगन मा यी बठे. वाटवरन्या आयाबायास्ले बलाये इकडनं तिकडनं चावळाले.
"व धोंडी! तुले समजनं का?”
"हा बोल वं माडी! काय व्हयनं ! आज काय खबरबात? " अशी सुरुवात व्हयनी का समजी लेवान आते दिवेलागणी व्हयीस्तोवर म्हतारी काय उठाउ नई!
परोनदीन नी गोट शे! धल्लीनी चाभर चाभर सुरु व्हयनी.
“वं बहिन तुले काय सांगु! भलता उप्पात मांडेल शे या मोबाईलनी! मांगल्या महिन्यामा लगिनले गयथु. तथानी गंमत सांगस तुले. नवरदेव पारवरथुन ऊना,लगिन लागं, हार टाकायी ग्यात ! नवरदेव नवरीले होमना जोडे बठाडेल व्हतं. तर ती नवरी खाली मुंडी घाले आन हासे. मी म्हंत,काय चांगलं वळण लावेल शे पोरले मायबापनी! वर मान करीसन बघत बी नाई हाई पोर! नैत तिना जोडे बठेल ती सांडोरी! त्या झिपाट्या, त्या बाल बठ्ठा उंद्री लागेल आन त्या कपडा!नुसता नखराच देखी ल्या! चवनीन ढवनी सोंगाडी! मी धीरेच मना व्हवुना कान मा बोलनु. दख व इजु, आसं वळण जोयजे पोरीस्ले. मन्हा आबाना करता अशी पोरगी जोयजे, नै का? व्हवु तोंडले पदर लावीसन धीरेच माले बोलनी. म्हने "नई व आत्याबाई, ती त्या मोबाईल मा दखी राह्यनी,त्या व्हॉटस अप का काय म्हंतस ना त्यामां.
हात्तं मरो, काय जमाना येयेल शे! आसा बठ्ठा लोके चगी जायेल शेतस त्या डबडाना पायरे! इतला इतला पोरे आखो गांxxxx धुवानी अक्कल नै न त्या बी मोबाईल मां बोटे घाल्तस! त्या मन्हा नात नातु बी दिनभर आथा तथा कुत्र्यानं गत पयतस आन संध्याकायले घर येताबरोबर ते डबडं हातमां! एकनं तोंड इबाक, एकनं तिबाक.ना घरमां काई काम, ना अभ्यास, ना येरोनेर संगे काही बोलनं ! बस्स आख्खी रातभर त्या मोबाईल टिभलतस! त्या पोराटोरास्लेच काय म्हनावं! त्या आम्हन्या नटमोगऱ्या शिकी जायेल शेतस आते! काम मा ध्यान नई शे.मोबाईलमा टुकटुक व्हयनं का लगेच घेवाले पयतस! कालदीन तं आख्खा कुकर शिट्ट्या फुकी फुकीसन काया पडी ग्या.पण एकन बी ध्यान नई व्हतं. मंग वरजनु,"कथा शिलगन्यात ठिगळ गोमाश्या?ग्यास इझाडी द्या ना! कान शेतस का सुपडां?चवन्यान ढवन्या…!” मंग दखं त धाकली कानमा त्या मोबाईलन्या काड्या घालीसन आरामशीर बठेल शे. घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा!
इबाक धल्लीनं चावयनं व्हयनं. अन तिबाक धाकली व्हवु ने आंडेर ले बलाई लिधं. खुसफुस व्हयनं .येरोनेर नी डोयाना इशारा किधा आणि आंडेर म्हतारीना जोडे जाई बठनी!
“आज्जी, वं आज्जी!”
“काय शे वं? “
“हाई दख ना! मी तुले एक मजा दाखाडस! “
“काय दाखाडी राह्यनी?”
“हाई दख! आते मी तुले हाई मोबाईल कसा वापराना ते शिकाडी देस!”
हावो! आते माले काय करनं शे शिकीसन? आरध्या गवर्या ग्या मन्ह्या मसनवटीमां!
आज्जी! आवं तुले हाई उनं ना तं तुले आत्या बी दिखी यामा. परोंदिनच मी हाई व्हाटस अप टाकेल शे. आते तु तिन्हा संग बात बी करु शकशी.
आंडेरनं नाव काढता बरोबर म्हतारी ना चेहरा खुलना.
"काय सांगी राह्यनी? माले तर काही समजी नही राह्यनं! मरो काय काय नविन टेकनिक यी काय सान्गता येत नै!"
“दम धर,मी शिकाडस तुले! आते दख हाई आठे आस सापना गत बोटे फिरावा ना कि तो मोबाईल उघडी जास.“
धल्ली: आह्या माय वं! खोलनं पडस का हाई डबडाले बी?
नातः हावो मंग त्याले बी कुलुप ऱ्हास!
धल्ली: आस बी ऱ्हास का? तुन्हा मायना तोंडले नै का व काई आस काही कुलुप लावता यी?
नातः आज्जी तु आथा द्ख ना! हाई द्ख आते असा बोट फिरावना का हाई पडदा पडस. मग हाई कोपराले चौकोन दिखी राह्यनात का तुले?
धल्ली: हा वं माय, दिखी राह्यनात ना!
नातः त्याले बोट लाव बरं!
धल्ली: हाव ह्ये लावनं बोट. हाई काय उनं आते?
नातः आज्जी तुले ए बी सी डी येस ना?मंग आठे काय शे? D ते डाटा कनेक्शन र्हास. त्याले बोट लाव.आते हाई खुली गय विंटरनेट!
धल्ली; वं मन्ही माय वं! याले म्हंतस का ते विंटरनेट,फिंटर्नेट ...!
नातः नई ना वं आज्जी! आखो शे...
धल्ली: हा वं माय.तुच राह्येल व्हती माले शिकाडानी आते.खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी!
नातः तु दख त खर गंमत. मंग जे काय यी ना त्याले ok म्हनानं म्हन्जे हाई ok लिखेल शे ना त्याले बोट लावानं .व्हयनं? आते हाई हिरवा फोन दिखी राह्यना का तुले? हाई व्हाटसआप र्हास....
धल्ली: हा वं माय!
नातः त्याले बोट लाव. बस्स व्हई गय सुरु.
धल्ली: हा लावना बोट, आखो?
नातःमंग आते तुले आत्याना फ़ोटो दिखस का?
धल्ली: वं माय वं! काय लक्ष्मी ना गत दिखी राह्यनी मन्ही पोर!
नातः आते हाई दखस का मराठी "अ आ ई.तठे त्या अक्षर टाईप कराना. तुले थोडी प्रेकटीस करनी पडी. पण यी जाई! टाईप कर बर आठे!
धल्ली: काय टाईप करानं? आवाज बी यी का तिन्हा याम्हां?
नातः हा आवाज बी येस ना! काय बी टाईप कर! पह्यले तिले सांगजो बरं तु कोन बोली राह्यनी ते.
धल्ली: बर्र." को न? अ ल की शे का. मी तु न ही मा य बो ली रा ह नु आ था ई न!
नातः व्वा व्वा आज्जी! तुले त एका झटका मा यी गय!
धल्ली: पन मंग माले कसं समजी की ती बी तिकडुन बठेल शे हाटस अप वर!
नातः आव आज्जी,आत्या जव्हय यी तव्हय ती तथाईन मेसेज टाकी दी ना! ती बग उनी आनलाईन! हाई तिन्ह नाव ना खाले लिखेल शे ना ते वाची ले विन्ग्लीश मा!
बास्स, त्या दिनथीन धल्लीनी शिकवनी सुरु व्हयनी.
धल्ली: काय मस्त शे व हाई डबडं! मी उगाच त्याले गाया देउ पह्यले. आते तं मी रोज आंडेर ना संगे गप्पा मारु!
नातः आज्जी,इतलच नै शे. मी तुले गेम बी शिकाडस दख! हाई शे 'सबवे सर्फ' गेम!
धल्ली: माले फक्त सर्फ नी पावडर म्हाईत शे वं बहिन!
नातः आवं आज्जी हाई रेस ना गेम र्हास! हाई दख.हाई आगगाडीना रुय शेतस ना, हाई पोरगा शे ना तो दख आगगाडीनावर काहीतरी चिंखडी राह्यना ब्रश लिसन. म्हणुन त्याना मांगे हाऊ पोलीस शिपाई लागस. आते त्या पोर्याना वर तु बोट लावं का तो जीव खायीसन पयस. मधे मधे सोनान्या नाणां पडेल शेतस त्या बी गोया करस. हा फक्त एक ध्यानमां रखजो का त्या पोर्यानी टक्कर नई व्हयनी पायजे आगगाडीना डबाले. हाई आसा मोबाईलना वर बोटे फिरावा का तो आगगाडीना वर चढीसन पयस. तठे बी सोनाना नाणां रखेल शेतस दख! बस आपनले जादा से जादा हाई सोनाना नाणा गोया करना शेत.
हाई आठे नात धल्लीले शिकाडी राह्यंथी आन तठे सैपाकघरमां येरोनेरना हातवर टाया पडी राह्यंथा. ह्ये आस व्हयन नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये”
आते धल्ली रोज सकाय सकाय उठनी का खाटवर बठस. उसशीना खाले रखेल मोबाईल काढस. रोज आंडेर ना संगे बात करस. नेट पॅक संपना का एक शंभर नि नोट आणि एक पन्नासनी नोट देस नातुले. मंग नातु १४० ना नेट पैक रिचार्ज मारी येस आणि १० नी नोट नातु ना खिसामा जास. एकच व्हयनं धाकली व्हवुले तिन्हा मोबाईल कुर्बान करना पडी ग्या थोडा दिन. पन त्यान्हा काय फरक नै पडाउ.ती गंज लाडका दिव्वा शे तिन्ह नवर्याना. भेटी जाई तिले बी नवा मोबाईल.
आते रोज सकाये सकाये चौधरीनना आंगणमां शांती र्हास आन बठ्ठ्या "चव नै न ढव नैन सोंगाड्या" बी निवांत र्हातस.
                                                                 __xxx_