थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Friday 22 April 2011

खानदेशी पाककृती: बाजरीची खिचडी/ ढासले

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
 
लागणारे जिन्नस: 
बाजरी : एक किलो
तांदुळः अर्धी वाटी
तुरीची दाळः अर्धी वाटी
गुळ, साजुक तुप, मीठ नेहमीप्रमाणे

तिखट करायची असल्यासः फोडणीसाठी १-२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन, ओले वाटाणे, शेंगदाणे, लसुण, हिंग, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला
क्रमवार पाककृती: 
ढासले : म्हणजे बाजरीची खिचडी म्हणा हवे तर.
७-८ माणसांसाठी एक किलो बाजरी धुवुन निथरुन ठेवावी...थोडीशी सुकल्यावर ओलसर असतांनाच कांडावी. पाखडावी म्हणजे टरफले निघुन जातात. नंतर चाळणीने चाळुन घ्यावी ..म्हणजे पीठ, कोंडा काढता येतो. आता ही बाजरी त्यात अर्धी अर्धी वाटी तांदुळ ( खिचडीचा) आणि दाळ (तुरीची किंवा हरभ-याची) घालुन मीठ, किंचीतशी हळद , हिंग घालुन कुकरमधुन २-३ शिट्ट्या करुन काढावी. खिचडीला पाणी जास्त लागते कारण बाजरी आणी तुरीची दाळ! गरमागरम खिचडीवर गुळ, तुप घालुन खातात.
थंडीच्या दिवसात उत्तम.
हीच खिचडी आम्ही तिखट करतो. कांदा, लसुन, हळद, हिंग,लाल तिखट, शेंगदाणे, (ओले वाटाणे ही घालतात)घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यात पाणी ओतुन वर सांगितल्या प्रमाणे पाखडलेली बाजरी, तांदुळ, तुरीची दाळ धुउन टाकावे. ही खिचडी शिजत असतांनाच असला खमंग वास पसरतो कि यंव!!! स्मित खिचडी शिजली की वरुन चिरलेली कोथिंबिर पसरावी.
वाढणी/प्रमाण: 
७-८ जणांसाठी
अधिक टिपा: 
खान्देशी माणुस आणि खिचडीच वेगळच नातं आहे. खिचडी आणी वर तेलाचीच(शेंगदाणा/गोडेतेल) धार...कसली सर नाही त्याला. आणि हो, तेल कच्चेच असावे...
मग त्याबरोबर कैरीचेच लोणचे, पापड, हा सरंजाम असला किंवा नसला तरी चालते.
माहितीचा स्रोत: 
आई

2 comments:

  1. धुळामा राहीसन धुळाना इतीहास माहीत नहीअामले आभारी 

    ReplyDelete
  2. खुप स्तुत्य प्रपंच चालवताय तुम्हि. मी मुळ खानदेशी नसलो तरी माझे बरेच मित्र खानदेशी आहेत त्यामुळे ह्या भाषेविषयी, लोकांबद्दल, त्यांची संस्कृती, खाणे-पिणे ह्या बद्दल जाम ओढ आणि आदर आहे.
    तुम्हि खानदेशी "काळ्या आमटीची" पण पाककृती टाका ना, ती आमटी जी पुरणपोळी बरोबर केली जाते, त्या बरोबर कुरडई, पापड, भजी खाल्ले जातात. व्वा काय बात आहे त्या आमटीत :)

    ReplyDelete