थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Sunday 8 May 2011

खान्देशी पुडाच्या पाटोड्या





लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 
पुडाच्या पाटोड्या हा एक अस्सल खान्देशी पदार्थ. आखाजी (अक्षय्य तृतीयेला) माहेरी आलेल्या मुलींना घेण्यासाठी आलेले आमरस पुरणपोळीसारखं गोड पदार्थ खाउन कंटाळलेले जावईबापुंनी घरात ऑर्डर द्यावी व सासुबाईला म्हणावे, "मामी, आज तुमच्या हातच्या पुडाच्या पाटोड्या होऊन जाउ द्या!" आणि सासुबाईनी सकाळपासुन खपुन बनवलेला पदार्थ आग्रह करकरुन जावयाला वाढावं, तर यावर जावयाने "तुमच्या हाताची सर कधी आमच्या 'हिच्या' हाताला येतच नाही"!असं बोटं चाटत खात म्हणावं, असा हा पदार्थ आहे. सासुबाईं जावयासाठी पदार्थ बनवतांना जरा सढळ हातानेच सामग्री वापरतात.

तसं या पदार्थाला 'सात पुडी पाटोड्या/ पाटवड्या', 'बाफेल वडी' अशीही नावं आहेत. तसच याला तसा कुटाणा ही फार आहे. पण नंतर एकामागोमाग एक तोंडात टाकताच विरघळणारी मसालेदार पाटोडी खाण्यापुढे हा कुटाणा 'चलता है"!
सामग्री:
पाटोड्यांसाठी:बेसनः ५ मध्यम आकाराच्या वाट्या भरुन
गव्हाचं पीठः एक मूठभर
आत लावायच्या मसाला:कांदा
लसुण
सुकं खोबरं
आले
चटणी
हळद
गरम मसाला
तेजपान
दालचिनी
दगडफुल
बाजा/चक्रफुल
लवंग
मिरी
हे सगळं एकत्र वाटुन घ्यावे. आणि थोड्या तेलावर परतावे अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्यात मीठ कालवुन कटो-यात काढावे.

कांद्याची करपी:
अर्धा किलो कांदा बारीक चिरुन
लसुणः एक मध्यम आकाराची वाटी लसुण सोलुन
कढईत तेल टाकुन त्यात हा कांदा निट नरम होईस्तोवर परतावा. त्यात हळद आणि चवीपुरते मीठ घालावे.
हीच कृती लसणाच्या करपीसाठी करावी.
आता ही कांदा-लसणाची करपी एकत्र करुन एका कटो-यात काढुन ठेवावी.

सुके खोबरे: एक खोब-याची वाटी सुके खोबरे किसुन आणि अगदी थोडे तेल तव्यावर टाकुन त्यात हे नावाला भाजुन घ्यावे.
कोथिंबिरः बारीक चिरुन एक वाटी
खसखस : वरुन पेरण्यासाठी
क्रमवार पाककृती: 
पाटोड्यांची कृती:सुरवातीला पाण्याला फोडणी देणे म्हणजे थोड्या तेलात हळद टाकुन लगेच ३-४ कप पाणी ओतणे, पाण्यात हिंग, ओवा, चवीपुरते मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटली की बेसन+ गव्हाचे पीठ हे मिश्रण हळुहळु त्यात ओतत जावे, पीठाची गुठळी होऊ न देता ते लाटण्याने घेरत जावे. व्यवस्थित घेरले/हाटले गेले की थोडे शिजायला ठेवावे. नंतर त्या पीठाच्या गोळ्यावर ओला कपडा झाकुन ठेवावे.
आता एक स्टीलचे ताट पालथे मारुन त्यावर प्लॅस्टीकची बॅग एका बाजुने कापुन घ्यावी त्यात हा गोळा घालुन हाताने मळावे आणि गाठी (असतील तर) व्यवस्थीत हाताने मळुन एकजीव करुन घ्यावे. (प्लॅस्टीकची बॅग- हाताला चिटकु नये आणि पीठ गरम असल्याने) आणि तसेच त्यावरुन लाटणे फिरवुन मोठ्या पोळीसारखे लाटुन घ्यावे. आता वरचा प्लॅस्टीकचा कागद काढुन घ्यावा.
या आख्ख्या पोळीवर सुरवातीला जो वाटलेला मसाला आहे त्याचा एक लेयर द्यावा. नंतर त्यावरुन कांदा लसुण च्या करपीचा एक थर द्यावा. त्यावरुन बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा एक थर. त्यावर सुके लांबलांब किसलेल्या खोब-याचा एक थर, आणि सर्वात शेवटी खसखस पेरावी.
आता दोन्ही बाजुने या पोळीची एकेक पट्टी वाळावी पुन्हा त्यावर वरीलप्रमाणेच एकेक थर द्यावे. अशा रितीने पोळीच्या पट्ट्या वळवुन प्रत्येक फोल्डवर असे थर येतात. बेसनाची पोळी मोठी असेल तर एकावर एक असे ७ थर येतात. सर्वात शेवटी तिरप्या आकारात चाकुने छेद द्यावे.

आणि तशीच प्लेटमधे वाढावी. या पाटोड्यांबरोबर मसाल्याची आमटी आणि चपाती करतात.
वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांसाठी
अधिक टिपा: 
एवढा कुटाणा करुन केलेल्या पाटोड्या टिकत नाहीत हेच ते काय ते एक दुखणं!अरेरे
त्या संध्याकाळपर्यंत सुद्धा रहात नाही. फ्रीजमधे ठेवल्या तर मसाल्याचा सगळा वास, चव निघुन जाते.
माहितीचा स्रोत: 
आई

No comments:

Post a Comment