थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Saturday, 14 May 2011

खान्देशी लग्न पद्धती आणि चाली रिती, लग्नातली गाणी इ.

पुर्वी सांगितल्याप्रमाणे, खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो.
तिथली विवाह पद्धती, चाली रिती सर्वांना माहित व्हावी एवढीच अपेक्षा. मी माझ्या (बाल) बुद्धीप्रमाणे अर्थ लावलाय तो गोड मानुन घ्यावा.
टीपः खान्देशी किंवा अहिराणी भाषेत 'शे' (म्हणजे आहे) हा शब्द म्हणजे गुजरातीतल्या 'छे' चा अपभ्रंश आहे. तसच 'ळ' शब्द उच्चारता येत नसावा म्हणुन सगळीकडेच "ळ' च्या ऐवजी 'य' वापरलेला दिसतो.
खान्देशी लग्नात लगिनघाई लग्नतारखेच्या आठ दिवस आधीपासुन सुरु होते. सुरुवातीला पितरांना मान दिला जातो. ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर व सवाष्ण जेऊ घातले जातात नंतर देवाचे कार्यक्रम सुरु होतात त्यात पाच सवाष्णींनी मिळुन गव्हाची रास पुजणे नंतर पाच सवाष्णींच्या हस्ते हळद फोडणे, खंडोबाचे अष्टीवर जेऊ घालणे, सोनाराकडे दिलेले देव आणण्यास वाजत गाजत जाणे(हे बहुधा वराची / वधुची बहिणे मेव्हणे जातात), कुलदेवतेचा कुळाचार म्हणजे कुळधर्माच्या आरत्या इ., देवांना आमंत्रण, तेलन पाडणे, लग्नाच्या हे विधी अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात.
या प्रत्येक विधीच्या वेळेस बायका गाणी म्हणतात. एक वयस्क बाई आधी एक ओळ म्हणते, तिच्या मागुन सगळ्या बायका कोरस धरतात. खाली मी एकेक गाणं आणि त्यांचा जरुर तिथे अर्थही देत आहे.
हळद फोडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे:
सप सोनं ओ सपननी आरती
म्हारा सपनामां आया कुंकूना जोड
बानू आया ओ लाडाले कुंकू चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||१||
म्हारा सपनामां आया हळदीना जोड
बानू आया ओ लाडाले हळदी चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||२||
म्हारा सपनामां आया चोखाना जोड
बानू आया ओ लाडाले चोखा चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||३||
म्हारा सपनामां आया बाशिंगना जोड
बानू आया ओ लाडाले बाशिंग चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||४||
म्हारा सपनामां आया कांकणना जोड
बानू आया ओ लाडाले कांकण चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||५||
हळदी, कुंकू, तांदुळ, बाशिंग, कांकण या ५ वस्तुंना विवाह विधींमधे फार महत्व आहे.
चोखा: गुजरातीत तांदुळ.
कांकणः घोंगडीच्या छोट्या चौकोनी तुकड्यात हळकुंड, सुपारी आणि लोखंडी खिळा बांधुन तो हळदीने पिवळ्या केलेल्या दो-याने शिवुन वधु/वरांच्या उजव्या हातात बांधतात. हळद लावल्यावर 'बाहेरची बाधा' चटकन होते, त्यावर तोडगा म्हणुन हे बांधतात.


हळद लावायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे
गंगा जमुना दोन्ही खेटे
तठे काय रोपे देवपह्याले
तठे काय कापूसना बेटे,
तठे काय परभू उखले ताना
विस्नु किस्नु कांड्या भरे,
राय रुक्मिनी पोयतं करे
तठे काय सिताबाई काटे,
तठनं पोयतं कोनले आनं
तठनं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आनं
(वधु/वराच्या बाबांचे नाव) ना बाप गोडे उना
बाशिंग मोती जडे उना, वाजा गये रथ उना
मोती पये रथ उना
हेच गाणं नंतर 'बाप' या जागी मामा, भाऊ, काका, मावसा हे टाकुन म्हटलं जातं.
(खान्देशात कापुस फार पिकतो. कल्पना केलीय की गंगा जमुना या पवित्र नद्यांच्या खोर्‍यात आलेल्या देवपह्य म्हणजे देवकपाशीच्या झाडापासुन विष्णु कृष्ण या देवांनी कापुस काढला जिचं राही रुक्मीणीने पोयतं केलं आणि ते सीतामाईने वधुसाठी आणलं. तर वर/ वधुचा बाप/ मामा/ भाऊ/ काका/ मावसा हे घोड्यावरुन ते घेण्यास गेले. आणि त्याला बाशिंग मोती जडलेले होते. बरोबर वाजा म्हणजे बॅन्डबाजा घेउन गेले आणि तिकडुन मोती पये (पोवळे) भरलेला रथ घेउन आले.)
शब्दार्थःपोयतं: हळद लावलेलं पाच पदरी कच्चं सूत वर/वधुच्या गळ्यात घालतात त्याला पोयतं म्हणतात. वर/वधुला भोवती रांगोळी काढलेल्या पाटावर बसवतात. पाटाच्या चारही कोपर्‍यात तांब्याचे/पितळाचे तांबे ठेवलेले असतात. या चारही तांब्यांच्या भोवतालुन पाच पदरी कच्चं सूत गुंडाळले जाते नंतर हे गाणे म्हणत ते सूत काढुन घेतात. त्याला पाच सवाष्णी भोवती धरुन पाण्यात कालवलेली हळद लावतात. मग ते सूत वधु/वरांच्या गळ्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करुन वधु/ वराला घातले जाते.
तठे: तिथे, तठनं: तिथलं
कोनले: कोणाला
उना: आला
आनं: आणलं
देवपह्यः देवकपाशी- ह्या झाडापासुन वर्षभर कधीही कापुस मिळतो.
पये: पवळे

तेलन पाडणे म्हणजे एका वाटीत थोडं गोडेतेल घेउन त्यात देवकपाशीची किंवा आंब्याच्या झाडाच्या काडीला कच्च सूत ५ वेळेस गुंडाळुन ती वाटीत उभी करतात. मग ५ सवाष्णी ती वाटी घरातल्या एकेक देवांवर धरुन खालील गाणे म्हणतात.

तेलन पाडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे

समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
गणपतीवर तेलन पडे सरस्वतीले बलाव जा ||१||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
खंडेराववर तेलन पडे म्हाळसाले बलाव जा ||२||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कानबाईवर तेलन पडे रानबाईले बलाव जा ||३||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कुळमातावर तेलन पडे भवानीले बलाव जा ||४||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
शब्दार्थः
कालव जा : कालवुन घ्या.

आता हीच वाटी चुलीवर धरायची आणि खालील गाणे म्हणायचे.
चुल्हा म्हणे मी चुल्हा देव, लाया चंदन कपाय्या
आन शिजे सव्वा खंडी, या आननी किर्ती मोठी
लोक जेवती लखोपती ||१||
शब्दार्थः
कप्पाया: कपाळाला
आनः अन्न

त्यानंतर सवाष्णी ही वाटी विहीरीवर धरतात. वे हे कडवे गायले जाते.

कांजील म्हणे मी कांजीलपाणी,कांजील कशीयाना राशी
कांजील द्राक्षाना राशी, कांजील वंगळवाणी दिसे
कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील म्हणे मी कांजीलपाणी, कांजील कशीयाना
राशी कांजील निंबाणीच्या राशी कांजील वंगळवाणी
दिसे कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील: विहीर
त्यानंतर ही वाटी ताक घुसळायच्या मडक्यावर किंवा उखळावर धरायची.

दारन म्हणे मी दारनदेव, दारन घुसळे ओ कोन
दारन घुसळे ओ सिता, इनी सोनानी रांजनी
इना नागमोडी रई, तुटा तुटा रई दोर, लावा लावा मोत्या सर
इना तांबा ना ओ लोटा, इनी धरमजा वारा
इनी: हिची
सोनानी: सोन्याची
रांजनी: रांजणी
रई: रवी

आता ही वाटी उंबरठ्यावर धरायची.

तु उठरे कबाडी खांदी घेतल्या कुर्‍हाडी
डोई घेतल्या भाकरी, गेला डोंगर पखाडी
साग तोडजो निबाडी ,उंबरट गाड्यात घातीला
उंबरट शेल्याने झाकीला टाका सुतारच्या दारी,
उंबरट सुतार घडीया, उंबरट लव्हार जडीया
उंबरट मिनार मढीया, उंबरट वापरे ओ कोन
उंबरट वापरे ओ सिता,
हाती इना रत्ने चुडा, मुखी इना पाननां ईडा
माथी इना भंवर जुडा, हाती चंदननी वाटी
सूर्या शिपडत जाय, बाळ खेळाडत जाय
अर्थः उठ रे कबाडी, कबाडी उठला, कु-हाड घेउन डोंगरावर गेला आणि असली सागाच्या झाडाचे निबर लाकुड उंबरठ्यासाठी तोडुन आणले. हा उंबरट बैलगाडीत घातला, शेल्याने झाकुन सुताराकडे टाकला, सुताराने घडवला, लोहाराने जडवला, त्याला मिनाकारी केली आणि हा असा उंबरठ वापरतय कोण तर सिता माई जिच्या हातात रत्नजडीत चुडा, मुखी पानाचा इडा आहे. जिच्या डोक्यावर भंवर जुडा आहे आणि ती हातात चंदनाची वाटी घेउन उंबरठ्यावर शिंपडतेय. मधेमधे बाळ लुडबुडतोय.
पुन्हा ती वाटी घराजवळच्या उकीरड्यावर नेतात. किंवा घरातलाच कचरा गोळा करुन त्यावर धरतात.

उकीरडा म्हणे मी उकीरडा देव, उखल्ले पुंजा कोन टाके
उखल्लाचे पूजा सिता टाके, हाती सोनाना खरोटा
झाडी उनी गाय गोठा, इनी रुपानी डालकी
इनी मोत्यानी चुमय, इना उकरडा क्यावं मोठा
उखल्ला: उकीरडा
अर्थः उकीरडा म्हणतोय मी उकीरडा देव. कारण यावर पुंजा म्हणजे कचरा कोण टाकतेय तर साक्षात सितामाई. ती सोन्याच्या खराट्याने गायीचा गोठा झाडुन आलीय आणि तिची रुप्याची डालकी म्हणजे टोपली, व मोत्याची चुमय(चुंभळ) आहे.


आता ही वाटी दिव्यावर म्हणजे समईवर धरतात. आणि पुढील कडवे म्हणतात.

दिवा म्हणे मी दिवलाया, दिवा निवाजना कोठे
गावत्या आनंदाना पेटे, अरे तू शिलावर भावू
सांग तुनं दिवलायानं मोल, सव्वा लाई वर लाख
देऊ दिवा सोबनले लऊ, दिवाले नवु मणनी वात
दिवाले आनंदानं तेल, दिवा जळे मांडवात
या वर्‍हाडी वापरती, कलाबूत झळकती

असं फिरत फिरत सर्वात शेवटी ही वाटी नवरदेववर/ नवरीवर धरतात. शेवटचे कडवे:

हाई काय सुतारनं पाट वर काय परभूतानी घडी
वर मोतीनं चौक भरी, हाई काय कसारनी वाटी
हाई काय नागिननं पान, हाई काय सरावन कांड
याले काय कच्चे सुतं गुंड, हाई काय तेलनीनं तेल
अरे तु नंदूराया तेली, तुन्ही चिंचोलानी लाट
तुना अंबियाना घाना, हाउ काय सोताना डबना
तेल इकस मोहना ह्या काय तेलन्या पाची धारा
नवरदेव ...वरी धरा
एक फूल तोड ओ सवासणी, द्या त्या नवरदेवना कानी
अर्थः हे काय सुताराकडुन घडवलेलं पाट, त्यावर कोर्‍या कपड्याची घडी, वर मोत्याने चौक भरलेला. ही काय आहे अतर कासाराकडची वाटी, त्यात विड्याचं पान, त्याच्या वर एका काडीला गुंडाळलेलं कच्चे सूत, वाटीत तेलीणकडचं तेल. अरे नंदुराया तेली, हा तुझ्याकडचा तेलाचा डबा, तुझ्या लाकडी घाण्यावर काढलेलं तेल, त्याच्या पाच धारा नवरदेवभाऊच्या डोक्यावर धरा गं सवाष्णींनो!!

देवांना आमंत्रण देणे: एका ताटात ५ कणकेचे दिवे ठेवुन त्यांच्या मध्यभागी कुलदेवतेचा टाक आणि आजुबाजुला तेलन पापड्या म्हणजे मैद्यात फक्त हळद कालवुन पापडांसारख्या लाटलेल्या (मीठ टाकत नाही) व तेलात तळलेल्या पापड्या. असं ताट देवाला ओवाळतांना पुढील गाणे म्हणतात.
बाकीचे हातात हळदी कुंकुने माखलेले तांदुळ घेउन देवांना आमंत्रण देतात.

कच्चा सुतना बाजूला, टाका देवना दरबारी
कोना घरीन सोबत, नवरदेवघरीन सोबन
आमना निवते र्‍हायजा, तप्ती आंघोळ करजा
चंदन टिलक लावजा, बहिण भाचीले मुळ जायजा
रंगीत वहील्या जुपजा, तुमन्या रावन्या पावन्या
बैलं तुमनं जुंगून पुर्‍हान राम सोडी देरे गाई
लक्ष्मण दूध लेरे धोई, सिता दूध ले ओ ताई
दूध तपे गर्मे गर्मे, या दूधनी पिवळी साय
वास स्वर्गे जाय, स्वर्गे लोक काय म्हणती
मीर्गी लोकात काय काम होती,
आपला वशीला नांदती, कन्या पुत्र उजती
अर्थः कच्च्या सुताच्या बाजुला देवांचा दरबारी म्हणजे
आपली कुलदेवता देवांना वशिला लावते.
निवतं म्हणजे आमंत्रण. आमचं आमंत्रण घ्या, तप्त पाण्याने आंघोळ करुन घ्या, चंदनाचा तिलक लावा, बहिणी भाच्यांना मूळ घ्यायला पाठवा. रंगित बैलगाड्यांनी तुमचे पाव्हणे रावळे सर्वांना घेउन या. रामा गाई सोडुन दे रे आणि लक्ष्मणा गाई धु म्हणजे दूध काढ, सितामाई दुध तापव, गरम दुधाची पिवळी साय, त्याचा वास स्वर्गात गेला तर स्वर्गातले लोक काय म्हणतात," मृत्युलोकात काय काय कार्ये होतात..तिथले लोक आपल्या वशिल्याने कन्या/पुत्र उजवतात. "!


लग्नानंतर वधु वरांच्या आंघोळीच्या वेळी- दामेंडा
नवरदेवावरः
सोनानी कुदाई रुपाना दांडा, खनानी खनानी धुळानी खाण
धुळानी सोननी खाई माटी, ती माटी तम्हाने भरा
तम्हाने भरानी रुमाले झाका, वाजत गाजत कुंभार घरी
कुंभार भाऊनी दामेंडा घडी, दामेंडा घडीला चरीना दरी
माया व बहीणी तुमी र्‍हांदाले निंघा, आनानी उनानी गंगेनं पानी
कणीक भिजिल्या डाबन्यावानी, लोकाज भरील्या लिंबुना फोडी
पूरन र्‍हांदील्या खापर भरी, घड्या घालील्या कोपरभरी, खीरज र्‍हांदीली कापुर डेरा
भातज र्‍हांदीला मोगरान्या कळ्या, शेवाळ्या इळील्या आस
मनना तारा, लाडुज बांधीला रामना चेंडु, भज्याज तळील्या मखमली गेंद
कुरडई तळीली सूर्यानी कळी, पापड तळीला पुनमना चाँद,
जेवाडा जेवाडा नवरानं गोत, नवरानी गोतनी भूकमोड झायी,
कंबरपट्टाना कुस्मरा व्हई, बाहेर निघं वं नवरीनी माय
देखीले देखीले जवाई मुख, जवाई शे तुना हिरा माणिक
लेकज शे तुन्ही रत्नानी टाक
हा एक गंमतीशीर खेळ आहे. लग्न लावल्यानंतर वधु सासरी येते. तेव्हा हळद फेडण्याचा कार्यक्रम होतो. हळद लावल्यानंतर तिन दिवसाच्या आत फेडलीच पाहिजे असं म्हणतात, कारण हळदीच्या अंगाला बाहेरच्या बाधेचा धोका असतो.
शब्दार्थः दामेंडा: कुंभाराकडील मातीचं एक पात्र, र्‍हांदणे: स्वयंपाक करणे, जेवाडा: जेववा किंवा जेवायला वाढा.
अर्थः सोन्याची कुदळी, रुप्याचा दांडा, धुळ्याची खाण खणावी, धुळ्याच्या खाणीतले सोन्याची माती ताम्हणात भरा. ताम्हण रुमालाने झाकुन वाजत गाजत कुंभाराच्या घरी पाठवा. कुंभार भाउने दामेंडा घडवला. आया बहिणी आता तुम्ही रांधायला निघा. गंगेच्या पाण्याने कणिक भिजवली. खापरावरच्या कोपर भरभरुन पुरणाच्या पोळ्या (मांडे) केले. खीर रांधली, मोगर्‍याच्या कळ्यासारखा भात शिजवला. शेवया वेळुन घेतल्या (उकळत्या पाण्यात टाकुन काढणे), रामाच्या चेंडुसारखे लाडु बांधले. मखमली गेंदासारख्या दिसणार्‍या भज्या तळल्या, सूर्याच्या कळीसारखी कुरडया तळल्या. पौर्णिमेच्या चंद्रासारखा पापड तळला. नवरदेवचं गोत आता जेवायला बसवा. त्या लोकांची आता भूकमोड झालीये, कंबरपट्ट्याचा कुस्मरा म्हणजे कुसमरा झालाय. नवरीची आई आता तु बाहेर ये, जावयाचं मुख बघ, जावई तुझा हिरा माणिक आहे तर तुझी लेक रत्नासारखी आहे.


नवरीवरः
नवरानवरी गं कशा न्हाती, तेल पानी गं बने जाती
बनाच्या पान्याला मोर पीती, तिथुन मोर गं उधळीला
आंब्या चाफ्यावर बसविला, आंब्याचाफ्याची हिरवी काडी
नवरी मागते हिरवी साडी
नवरीला नवरा बलावितो, नवरीला कशाला बलावितो
नवरीला न्हायाला बलावितो, मखमलीचा विडा देतो
उठ गं नवरी भाग्यवंत दारी आला गं तुझा खंत

खेळः
नवरा नवरी लक्ष्मण बाय नवरी गयी मामाना आय
मामाजी मामाजी आंदन काय?
दिसु वं भाच्याबाई कपीली गाय, कपिला गायवर धांड्यानी जोडी
धांड्यानी जोडीवर रंगीत गाडी,
पलंग पेडीनी गादीनी दुपटा
गादीनी दुपटानी समया चारी, इथलं आंदन दैवानी नारी
इथलं लेशीनी परघर जाशी, आय बाना जिवले झाया लावशी
सासरा म्हणे सून माले मागनी झायी
अर्थः नवरी गेली मामाकडे, मामाला म्हणते," मामा, मला लग्नात आंदण काय देतोस?", मामा म्हणतोय देतो गं भाचीबाई, कपिला गाय देतो, कपिला गायीवर दोन वासरं/ बैलं देतो. बैलांवर रंगित गाडी, गाडीत पलंग, गादी, समया हे सगळं आंदण देतो. इथलं आंदण घेउन तु परक्या घरी जाशील. आई बापाच्या जीवाला घोर लावशील.

1 comment:

  1. khup chan mi hote kahi divas thithe
    jara sagalya khandeshi recipi share kara please

    ReplyDelete