थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Wednesday 7 December 2011

चिकोल्या/ वरणफळ

यालाच कोणी चिखल्या म्हणतं तर देशावर वरणफळ म्हणतात. एखाच्या रविवारी स्वयंपाकाचा चिकन इ. मांसाहारी किंवा तेच ते पोळी भाजी खाउन कंटाळा आला असेल हा सगळे जण घरात असतील तेव्हा करायचा मेनू आहे.
 
साहित्यः
वरणासाठी: एक वाटी तूरदाळ
हळद, हिंग, जिरे-मोहरी , कडीपत्ता वै. फोडणीचे जिन्नस
आवडत असल्यास गोडा मसाला
लाल तिखट
मीठ आवडेल तसे
चिंचेचा कोळ आणि गुळ
कोथिंबिर
चिकोल्यांसाठी: गव्हाचे पीठ
तेल
ओवा- १ छोटा चमचा
मीठ, हळद
क्रमवार पाककृती: 
 
कृती:
तुरदाळ हळद, हिंग घालुन वरणाला लागते तशी शिजवुन घ्यावी. नंतर हलकेच घोटुन तिला फोडणी द्यावी. त्यात गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ/गुळ आणि बरेचसे पाणी घालुन उकळु द्यावी.
एकीकडे, गव्हाचे पीठात ओवा, हळद , हिंग घालुन पु-यांना भिजवतो तशी कणिक घट्टसर भिजवुन घ्यावी. आणि १० मिनिटे कणिक चांगले मुरु द्यावी. त्यानंतर तिचे पोळपाट भरुन पोळीच पण जरा जाडसर लाटावी. त्याचे तिथेच शंकरपाळ्याच्या आकाराचे पण थोडे मोठे असे काप करावे. सुटे करुन उकळत्या वरणात टाकावे.गॅस जोरातच असावा. सगळे टाकुन झाल्यावर व्यवस्थित खाली-वर करुन, झाकण लावावे व गॅस बारीक करावा. १० मि. ठेउन चिकोल्या व्यवस्थित शिजल्या असल्यास, गरमागरमच सर्व्ह कराव्यात. आणि भरपुर तुप घालुन खाव्यात. (गरमागरम चिकोल्यांची चव नंतर थंड झाल्यावर नाही)
टीपः वरील कृती जाड बुडाच्या पातेल्यात करावी. कुकरमधे नाही.
तसेच चिकोल्या जनरली दुपारच्या जेवणालाच करतात. आणी दुपारच्या उरलेल्या चिकोल्या संध्याकाळी/रात्री जरी खाल्ल्या तरी चव देत नाहीत म्हणुन शक्यतो आटोपशीरच कराव्यात.
वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जणांसाठी
 
अधिक टिपा: 
गुजराती लोक, या वरणात तुरीच्या ओल्या शेंगा किंवा थोड्या गवारीच्या शेंगा टाकतात. टेम्प्टींग होते.
माहितीचा स्रोत: 
आई

1 comment:

  1. तुमचा ब्लॉग बघून प्रचंड आनंद झाला. मी देखील खान्देशीच आहे. आता तुमचा ब्लॉग regularly वाचेन. असा ब्लॉग सुरु केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

    ReplyDelete