थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Tuesday, 8 May 2012

कैरीचे लोणचे (खान्देशी पद्धतीचे)

मंडळी, लोणच्याचा सिझन सुरु झाला आहे. खान्देशी पद्धतीच्या लोणच्याची चव चाखायचीय?
चला तर मग...
परवाच आईला सोबत घेउन लोणचे केले. आईच्या हातचे लोणचे आमच्या आख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे. इथे पुण्यातही कॉलनीत, ओळखीच्यांकडे असे कुठुन कुठुन तिला बोलावणे असते लोणचं टाकण्यासाठी. एकदा तर बहिणीने नाशिकहुन फोन करुन ऑनलाईन लोणचे घातले होते. त्याची चवही अप्रतिम आली होती. स्मित
सगळी कृती आईचीच...मी फक्त हेल्पर.
एकाच गोष्टीबद्दल माफ करा लोक्स. लोणचं (ऑफीसातुन संध्याकाळी घरी गेल्यावर) रात्री टाकल्याने फोटो म्हणावे तितके चांगले आलेले नाहीत.

साहित्यः
कैर्‍या: १० किलो
मीठः दीड किलो
गोडेतेलः २किलो
ब्याडगी मिरची तिखटः अर्धा किलो
ब्याडगी मिरची आख्खी: पाव किलो किंवा अंदाजे
मोहरी दाळः ३ पाव
बडीशेपः अदपाव ( एक मध्यम वाटी भरुन)
मेथी: १५० ग्रॅ.
धणे: १५० ग्रॅ.
लोणच्याचा मसाला:
मीरे, लवंगा, दालचिनी, सूंठ पावडर - सर्व एक एक चमचा(पोह्यांचा)
हिंगः २ चमचे
वेलदोडे: १ चमचा
जायफळ (किसुन) : १ चमचा
क्रमवार पाककृती:
सर्वप्रथम कैर्‍या दोन दिवस पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर व्यवस्थित कोरड्या पुसुन सुड्याने(कैरी फोडण्याची विळी) फोडी करुन घ्याव्यात. आतला गर इ. काढुन टाकुन कैरीच्या फोडीसुद्धा पुसुन घ्याव्यात.














नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे आणि प्रमाण दिल्याप्रमाणे लोणच्याच्या मसाल्याचे सगळे जिन्नस कढईत टाकावे.



गोडेतेल गरम करुन (कडकडीत पण उकळते नको) ते यात हळुहळु टाकावे...म्हणजे लाल तिखट खरपुस भाजले जाते आणी छान लाल रंग येतो शिवाय चवीतही फरक पडतो. ब्याडगी आख्खी मिरची तव्यावर थोड्या तेलावर भाजुन घ्यावी आणि यात कालवावी.
सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.

एका बाजुला लोणच्याची बरणी (चिनीमातीचीच घेणे सोयिस्कर), व्यवस्थित पुसुन घ्यावी आणि मगच त्यात लोणचे भरावे.
फोडींच्या वर तेल येइल इतके तेल असावे.
लागणारा वेळ: 
२ तास

टिप: लोणचं टिकण्यासाठी मीठ आणि बुडतं तेल आवश्यक आहे.

माहितीचा स्त्रोतः मातोश्री
 
 
 
 
 
 
आणि आता २ महिन्यांनी संपुर्णपणे मुरल्यावर हे लोणचं असं दिसतय. :)
 

 
 

Thursday, 3 May 2012

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!















लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.

आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.


टीपः डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे

Wednesday, 18 April 2012

गव्हाचा पौष्टीक चिवडा! (Gavacha Chivada)


याला कुठलाही बुटका गहु चालतो. कल्याण सोना, किंवा लोकवन चालत नाही. पण २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती: 
प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.

वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.

आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! स्मित
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.
हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.

Thursday, 1 March 2012

अहिराणीतील खमंग संवाद!

अहिराणीतील खमंग संवादः
नुकतेच 'मराठी दिनानिमित्त' मायबोली या वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.

 प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे.

त्यातली ही माझी एन्ट्री:

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
दुसरी करवली: बैगं! तुन्ह्या लुगड्यामां तं नै अडकनि? कालदिन तु ते जरीनं लुगडं घालेल व्हतं ना! त्यामां धुंडी ले तं पह्यले.नवरीनी मावशी: आह्या माय वं! तुन्हा नाकमां तं दखी व्हती मी, तु बेळमाथनी पुजी राह्यन्थी तव्हय. कोन मरी जाय जो ना हात मां पडी व्हई ना तं कल्याण शे!

पहिली करवली: हाव ना व माय ! आते दिप्वॉळीले लिन्थी! यास्ले कळनं तं मन्ही काई खैर नई.


नवरीनी मायः हा वं बहीन्! जवाईले कळनं तं मग बसं व्हई गयं! आसा दांगडो घाली तो लगिनमां. आन दख तु...आथाईनच वापस जाई इले लिसन! आखो तिले आयुसभर डोस दीथीन तिन्हा सासरकडना लोके ... "भाउना लगिनमां गयी आन नथना आहेर करी उनी चोरास्ले.!!! " तुले सांगस.. हाई शुभीना नवरा भलता आग्यायेताळ शे! एक येळ इस्तव हातमां धरी जाई पन ह्यास्ना सोभाव ना ... बाप रे बाप! शुभे, तु आतेपुरती मन्ही नथ घाली ले बईन! पन त्यास्ले आतेच नको सांगु!


इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.

"माय वं, अण्णाले पह्यलेच सांगं व्हतं मी की मन्ह्या नंदासकडं (नणंदा) बी निवतं धाडनं पडी, पन त्यास्ले पत्रिका नै मियनी आतेपावत. तं मन्ही सासु कितली बोलनी माले, म्हाईत शे का? की इन्हा मायबापले काही वळनच नै शे तं पोरले कसं व्हई?, आनि इन्हा बाप तर नाक वर करीसन बोलस.. आसं आनि तसं...!" तु आते ना आते शरदले (चुलतभावाला) गाडी लीसन धाड आणि मन्ही नणंदले ली ये म्हना! माले काई म्हाईत नै...
नवरीनी मायः का वं कस्तुरा? माले एक सांग, तुन्ही नणंदना देरना (दिराच्या) लगनमां आम्हले निवतं धाडं व्हतं का?आन मंग आते कसा बोलतस तुन्हा सासरकडना? हाई दख! आते तुले खमकी व्हयनं पडी. ४ साल व्हई ग्यात लगनले...

नवरीना बापः आटपा आटपा... तठे नवरदेव ई लागना पारवर आनि तुम्ही काय चावळी राह्यनात आठे? हाऊ बबन्या कोठे शिलगना? वर्हाडना स्वागत कराले फुलमाळा सांगन्या व्हत्या मी कोपर्यावरन्या फुलवालाले! लेवाले ग्यात का कोन? तो सत्या, आज्या तर काई कामनाच नै शे!

त्या वाजावाला, पोटझोड्या उनात का? त्याले म्हना नेमबंद वाजवा, नवरदेवकडना वर्‍हाड पोची राह्यनं ! कव्हय जाई हाई 'सुख्या' आते पारवर? त्यान्हाबरोबर कोन जाई राह्यनं? शेवंता, धुरपदा,कली तुम्हन्या पोरेस्ले धाडा बरं सुख्याना बरोबर!

बबन्या: हाई काय ई राह्यनु हार लीसन! घ्या वं बहिनीओन... गजरा बांधा!

नवरीना काका(नवरीना बापले): दादा, मानकर्‍यास्नी लिश्ट व्हई ना? हाई नारय आनेल शेतस..,. नेमबंद मोजी ल्या बरं! पंगतीमां त्यास्ना ताटेसले लावाना शेतस!

नवरीनी आजली (आज्जी) : तेलनपापड्या लिध्यात का? आन सांजोर्‍या? त्या परमिलाले इचार बरं! गिरजे... नवरदेवले पारवर देवाले दुधशेवाया ली ले तं ताटमां!
नवरीची आई: हाओ आत्याबाई( सासुबाईला आत्या म्हणतात)! लिधं बरं मी बठ्ठं सामान!
नवरीना काका: चला चला..गाडीमां बठी ल्या!

Wednesday, 7 December 2011

चिकोल्या/ वरणफळ

यालाच कोणी चिखल्या म्हणतं तर देशावर वरणफळ म्हणतात. एखाच्या रविवारी स्वयंपाकाचा चिकन इ. मांसाहारी किंवा तेच ते पोळी भाजी खाउन कंटाळा आला असेल हा सगळे जण घरात असतील तेव्हा करायचा मेनू आहे.
 
साहित्यः
वरणासाठी: एक वाटी तूरदाळ
हळद, हिंग, जिरे-मोहरी , कडीपत्ता वै. फोडणीचे जिन्नस
आवडत असल्यास गोडा मसाला
लाल तिखट
मीठ आवडेल तसे
चिंचेचा कोळ आणि गुळ
कोथिंबिर
चिकोल्यांसाठी: गव्हाचे पीठ
तेल
ओवा- १ छोटा चमचा
मीठ, हळद
क्रमवार पाककृती: 
 
कृती:
तुरदाळ हळद, हिंग घालुन वरणाला लागते तशी शिजवुन घ्यावी. नंतर हलकेच घोटुन तिला फोडणी द्यावी. त्यात गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ/गुळ आणि बरेचसे पाणी घालुन उकळु द्यावी.
एकीकडे, गव्हाचे पीठात ओवा, हळद , हिंग घालुन पु-यांना भिजवतो तशी कणिक घट्टसर भिजवुन घ्यावी. आणि १० मिनिटे कणिक चांगले मुरु द्यावी. त्यानंतर तिचे पोळपाट भरुन पोळीच पण जरा जाडसर लाटावी. त्याचे तिथेच शंकरपाळ्याच्या आकाराचे पण थोडे मोठे असे काप करावे. सुटे करुन उकळत्या वरणात टाकावे.गॅस जोरातच असावा. सगळे टाकुन झाल्यावर व्यवस्थित खाली-वर करुन, झाकण लावावे व गॅस बारीक करावा. १० मि. ठेउन चिकोल्या व्यवस्थित शिजल्या असल्यास, गरमागरमच सर्व्ह कराव्यात. आणि भरपुर तुप घालुन खाव्यात. (गरमागरम चिकोल्यांची चव नंतर थंड झाल्यावर नाही)
टीपः वरील कृती जाड बुडाच्या पातेल्यात करावी. कुकरमधे नाही.
तसेच चिकोल्या जनरली दुपारच्या जेवणालाच करतात. आणी दुपारच्या उरलेल्या चिकोल्या संध्याकाळी/रात्री जरी खाल्ल्या तरी चव देत नाहीत म्हणुन शक्यतो आटोपशीरच कराव्यात.
वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जणांसाठी
 
अधिक टिपा: 
गुजराती लोक, या वरणात तुरीच्या ओल्या शेंगा किंवा थोड्या गवारीच्या शेंगा टाकतात. टेम्प्टींग होते.
माहितीचा स्रोत: 
आई

Monday, 14 November 2011

लग्नाची गाणी

तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाली असेल खान्देशात.
माझ्या लहानपणी, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर लग्नाची गाणी जुळवायची खुप क्रेज होती. त्यावेळचेच हे एक गाणे आठवतेय. एकत्र कुटुंब पद्धती, त्यात लग्नाच्या तारखेच्या ८-१० दिवसांपासुन घरात पाव्हण्या-रावळ्यांचा राबता सुरु व्हायचा. करवल्यांना खास आमंत्रण देउन बोलवले जायचे किंवा भाऊ स्वतः घ्यायला जायचे.. दिवसभर गव्हाची रास पाखडणे, निवडणे, हळद फोडणे ही कामे झाली की रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अंगणात सर्वांनी बसायचे. सगळ्या मुली,वयस्कर बायका बरोबर बसत. अशातच एकेकीला गाण्याचा आग्रह होत असे. एकीने सूर लावला की बाकीच्या तिला साथ द्यायच्या. मग एकमेकींच्या म्हणजे, नणंदांच्या, मामीच्या, वहीनीच्या उखाळ्या पाखाळ्या त्या गाण्यातुन काढायच्या. वहीनी पण हसुन दाद द्यायची त्यावेळेस.  मग एखादी नणंद उठायची .. नाचत नाचत भावजईच्या पुढे चुटक्या वाजवत गाणे म्हणायची," वारभर कपडा माले देशी ते सांगाले व्हतं वं सांगाले व्हतं" असं काहीसं एक गाणं होतं.
वडीलधारी मंडळी झोपाळ्यावर बसुन गंमत बघायची. तर नवरा मुलगा...मुद्दाम तिथे चक्कर मारत असे. मग कानावर पडलेल्या ओळींनी स्वतःशीच हसत असत. (इथे नवरी मुलगी असेल तर लाजेने चुर्र होई. मग कधी कधी गाण्यात्,'तुले सासरे जानं पडी... वै." सांगत ...तेव्हा नवरी, नवरीच्या आईच्या डोळ्यात पाणी येइ. )

ओ फिरकीवाली, तु कल फिर आना
नही फिर जाना, तु अपनी मकानसे
बने की शादी है बडी धुमधामसे

चैन तुम तो पेहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन में ठुशी
तु अपनी मकान से....
बने की शादी है बडी..

घडियाल तुम तो ओ पहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन मे ठुशी
तु अपनी मकान से...
बने की शादी है बडी धुमधाम से

Thursday, 29 September 2011

कानबाई- खान्देशातील एक प्रथा!




 श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. गौरीला करतात तसं डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते. कानबाईचे नारळ परनुन आणलेले असते. 

'कानबाई परनुन आणणे'-  पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जातो. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.

तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.

दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.
नदीवर एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वै. देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काशाच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....