थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Tuesday 26 April 2011

खान्देशी पाककृती: कळण्याची भाकरी आणी शेंगदाण्याची हिरवी चटणी

कळण्याची भाकरी:हा प्रकार खान्देशात थंडीच्या दिवसात करतात.
साहित्यः २ किलो ज्वारी + १किलो आख्खे उडीद दळून आणावेत.
काही ठिकाणी नुसत्या उडदाच्याच भाकरीही करतात...त्यासाठी १ किलो उडीदमधे एक मध्यम वाटी ज्वारी टाकावी.
तर हे कळण्याचे पीठ तयार झाले. त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा... मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा.....परातीला भाकरी चिटकु देउ नये...! (भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते). आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी (भाकरीचे पीठ नीट रगडले गेले आहे की नाही हे इथेच पहिल्यांदा कळते स्मित आणि तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी...म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत. आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे...म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी...(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा...आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा....भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी...म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी...सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.... हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा...म्हणजे आतील वाफ रिलीज होते.
या भाकरीचा पिज्झा स्मित करायचा असेल तर तव्यावरच पोपडा काढुन त्यावर लाल तिखट + लसुण +जिरे कांडुन (ठेचुन) केलेला तिखटाचा गोळा टाकावा तो तेल टाकुन व्यवस्थित पसरावा.वरुन पुन्हा पोपडा दाबुन टाकावा...थंडीमधे नाष्ट्यालाच काय रात्रीच्या जेवणालाही हा गावरान पिज्झा मस्त लागतो.
 कळण्याच्या भाकरीबरोबर, शेंगदाण्याची हिरवी चटणी करतात.

(नेटवरुन टाकलेला फोटो! )
शेंगदाण्याची हिरवी चटणी: थोडे शेंगदाणे भाजुन आणी हिरव्या मिरच्या थोड्या तेलात शेकुन कोथिंबिर, लसुण जि-याबरोबर मिक्सरमधे थोड्या पाण्यात फिरवाव्या. यात चवीप्रमाणे मीठ घालावे. ही चटणी मिक्सरमधे करण्यापेक्षा वरवंटा पाट्यावर वाटलेली असेल तर अजुनच टेस्टी!

1 comment:

  1. मागील दोन दिवस जळगांव भुसावळ, यावल या भागात होतो. कामानिमित्ताने गेले असतांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण स्थानिक लोकांकडे जेवलो. कळण्याची भाकरी मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत खाऊन जीभ तृप्त झाली. घरी खानदेशी पादार्थ करण्यासाठी गुगल मध्ये शोधतांना हा ब्लोग सापडला. धन्यावाद.

    ReplyDelete